मुख्य संपादक: सचिन गुडेटवार

‘राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी…’ उद्धव ठाकरेंचा इशारा! – News18 मराठी

मुंबई:  विधानसभा निवडणुकीला आता 2 ते 3 महिन्यांचा अवधी उरलेला आहे. असं असताना राज्यातील राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुलं चॅलेंज दिलं.

‘राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी…’ -ठाकरे

भाषणाता बोलताना उद्धव ठाकरे एकदम आक्रमक पवित्र्यात पाहायला मिळाले. ठाकरे म्हणाले “आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि देवेंद्र फडणवीसांना हिसका दाखवू. राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहिन…” असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलं. यावेळी उद्धव इतर महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

सरकारवर घणाघात:

“मला नाहक त्रास दिला. पण, सगळं सहन करून मी आता पुन्हा उभा राहिलो आहे. येत्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या गावी जातील.’ असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला. एकंदरीतच ठाकरेंनी केलेल्या या टीकेनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराचं वातावरण गरम राहणार आहे, हे मात्र स्पष्ट झालं आहे. ठाकरेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे उपस्थितांमध्ये चैतन्य बघायला मिळालं.

ठाकरे वैफल्यग्रस्त -दरेकर 

उद्धव ठाकरेंनी केलेल्या या तुफान फटकेबाजीनंतर सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांकडून देखील प्रतिक्रीया उमटणं अगदी साहजिक होतं. त्यानुसार, प्रविण दरेकर यांनी ठाकरेंच्या या टीकेवर भाष्य केलं. “उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहे. पक्ष गेला, नेते गेले त्यामुळे ठाकरे वैफल्यग्रस्त झाले. देवेंद्र फडणवीसांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरत प्रचंड त्रास दिला. राजकीय भाषा घसरू देऊ नका” असं दरेकर म्हणाले.

दरम्यान यावर अद्याप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा प्रमुख नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी आगामी विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची यामुळे चाहूल लागली आहे. ठाकरे अशाच आक्रमक पवित्र्यात सत्ताधाऱ्यांवर तुटून पडतील, असं राजकीय जाणकारांच मत आहे. ठाकरेंचा हा  आक्रमक बाणा राज्यातील जनतेला भावतो, हे सर्वज्ञात आहे. दुसरीकडे महायुतीकडून या प्रचार तंत्राला उत्तर देताना नेमकी काय रणनिती आखली जाणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Maratha Reservation: ‘मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला आमच्याकडे…’ ओबीसी नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link