मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – 2024” शासनाने लागू केली आहे. त्यामुळे आता 7.5 अश्र्वशक्ती (HP) पर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे.
शासनाचा महत्वपूर्ण निर्णय:
जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने धोरण ठरविले. त्यानुसार आता “एप्रिल 2024 पासून मार्च 2029 पर्यंत राज्यात “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – 2024” राबविण्यात येत आहे. तथापि, या योजनेचा 3 वर्षांत आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
या योजनेमुळे, सध्या देण्यात येणारे वीज दर सवलतीचे 6,985 कोटी रुपये तसेच वीज दर माफीनुसार 7,775 कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे एकूण 14,760 कोटी रुपयांची वीज दर माफी राज्यातील शेतकऱ्यांसाठी केली जात आहे.याबाबतचा शासन निर्णय शासनाने जारी केला असून तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे.
बळीराजाला खूश करण्याचा सरकारचा प्रयत्न:
हा निर्णय शेतकऱ्यांसाठी जेवढा महत्वाचा आहे. तेवढ्याच प्रमाणात शेतकऱ्यांची नाराजी दूर करणं राज्य शासनासाठी गरजेचं आहे. कांदा उत्पादक आणि इतर अन्य पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत होता. त्याचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत राज्यात पाहायला मिळाला. त्यानंतर महाराष्ट्र शासन खडबडून जागे झाल्याचे दिसत आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांचा सपाटा शासनाने लावल्ययाचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
ऑक्टोबरमध्ये राज्याची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांची नाराजी महायुती सरकारला परवडणारी नाही. हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हेरलं आहे. त्यामुळेच शासन शेतकरी हिताच्या आणि प्रसिद्ध योजना राबवताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अलीकडेच दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत देखील राज्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उपस्थित केले.
शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महत्वाकांक्षी योजनांची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मत मांडलं. लवकरच दुष्काळमुक्तीच्या अनुषंगाने सिंचन योजनांच्या पूर्ततेवर सरकारचा भर देण्याचा मानस आहे.
विरोधकांची टीका:
सरकार अनेक महत्वाकांक्षी आणि मोठ्या बजेटच्या घोषणा करत असले तरी विरोधकांनी यावर आक्षेप घेतला आहे. या योजनांसाठी लागणारा पैसा सरकारकडे आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे हा फक्त विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत केलेला गाजावाजा आहे, असा सूर विरोधकांच्या गोटातून येत आहे.
Nitin Gadkari: असं ट्राफिक मॅनेजमेंट राज्यात प्रथमच होणार, नितीन गडकरींनी सांगितला प्लॅन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.