मुख्य संपादक: सचिन गुडेटवार

शेतकऱ्यांनो, तुमचा माल विकताय, होईल असा स्कॅम….रहा सावध! – News18 मराठी

राहुल खंडारे, प्रतिनिधी

बुलढाणा: शेतकरी एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, सरकारी अनास्था अशा गोष्टींमुळे हतबल असतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची कोंडी होते ती व्यापाऱ्यांनी केलेल्या फसवणूकीमुळे, बुलढाण्यातून असाच एक फसवणूकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शेतीमालाच्या पैशांबाबतची ही फसवणूक एका डॉक्टराने केली आहे. नेमकं काय घडलं या शेतकऱ्यांसोबत?

आरंभ ट्रेडिंग कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक:

बुलढाण्याच्या  मलकापूर येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रफुल पाटील यांनी शेकडो शेतकऱ्यांकडून विश्वासाच्या जोरावर  कापूस, मका, सोयाबीनची खरेदी केली. एका महिन्यात पैसे देतो अशा बोलीवर त्यांनी हा माल शेतकऱ्यांकडून खरेदी केला होता. डॉ प्रफुल्ल पाटील यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना चेक आणि नोटरी करून दिल्या आहेत. परंतू, त्यानंतर मात्र पाटील यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली.

या घटनेमुळे आपली फसवणूक झाल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी डॉ. प्रफुल पाटील यांच्याकडे पैसे द्या म्हणून तगादा लावला. आज शेकडो शेतकऱ्यांनी डॉ  पाटील यांच्या हॉस्पिटलवर धडक दिली. स्वत: डॉ प्रफुल पाटील फरार असल्याने शेतकऱ्यांनी डॉक्टरच्या वडिलांना धारेवर धरलं, आमच्या मालाचे पैसे द्या, अशी आर्जव केली. त्यानंतर या घटनास्थळी पोलिसांनी पाचारण करण्यात आले.

शेतकऱ्यांची पोलिसांकडे तक्रार:

नंतर संतप्त शेतकऱ्यांनी मलकापूर पोलिस स्टेशन गाठले. मलकापूर येथील ठाणेदार गणी यांनी जमावाला शांत केले. रीतसर तक्रार दाखल करावी त्या नंतर कारवाई करण्यात येईल असा सल्ला दिला. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी यासंदर्भात रितसर तक्रार दाखल केली असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करणार आहेत.

VIDEO: कोल्हापूर, सांगलीनंतर आता गडचिरोली संकटात, हा अख्खा तालुका पूरात बुडण्याची चिन्हं?

शेतकऱ्यांनो, रहा सावध:

शेतमालाच्या बाबतीत व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणूकीच्या अशा घटना सातत्याने समोर येत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना माल विकताना शक्यतो बाजार समितीतील परवाना धारक अडते, दलाल यांच्या मार्फत विकावा. त्याचबरोबर व्यापाऱ्याकडे माल विकताना आधी त्याची पत तपासून नक्की बघावी, असे केल्यास तुमची फसवणूक टळेल, आणि कष्टाचे हक्काचे पैसे तुम्हाला मिळतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link