मुख्य संपादक: सचिन गुडेटवार

तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर..! मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा धाब्यावर कसा

मुंबई : बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. आज राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून बदलापूरमधील घटनेवर टीका करत मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.

मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही.

Badlapur: पीडितेच्या गर्भवती आईलाही पोलिसांनी 10तास बसवलं, धक्कादायक माहिती समोर

आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं हे पहिलं कर्तव्य नाही का ? जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे.

माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, असे राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शाब्बास पोलिसांनो! चिमुरडीवर अत्याचारानंतर 12तास झोपले, आंदोलकांवर रात्री गुन्हे

दरम्यान, बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. कल्याण कोर्टाने अक्षय शिंदे याला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याने असे आणखी गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याने हे कृत्य कसं केलं, काय सांगून तो मुलींना सोबत न्यायचा या गोष्टींचा तपास करायचा असल्याचं सांगत पोलिसांनी त्याची कोठडी मागितली. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link